रेडगाव खुर्द : काळखोडे येथील गणपत कारभारी वाकचौरे(७०) यांचा मृतदेह इंदोर-खंडवा रेल्वे पॅसेंजरमध्ये आढळून आला आहे.वाकचौरे हे इंदोर येथे लग्नासाठी गेले असता २७ तारखेला बेपत्ता झाले. नातेवाइकांनी आसपास तपास केला. अखेर इंदोर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. गेले आठ दिवस कुटुंबीयांसह नातेवाइकांनी ठिकठिकाणी शोध घेतला. त्यांच्या छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. अखेर शक्रवार, दि४ रोजी मध्य रेल्वेच्या खंडवा रेल्वे स्थानकावर इंदोर-खंडवा पॅसेंजरमध्ये गणपत वाकचौरे यांचा मृतदेह आढळून आला. वाकचौरे यांच्या जवळील निवडणूक ओळखपत्राच्या आधारे तेथील रेल्वे पोलिसांनी चांदवड पोलिसांमार्फत काळखोडे येथील कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली. नातेवाइकांनी शवविच्छेदना नंतर मृतदेह ताब्यात घेतला. शनिवारी रात्री उशिरा काळखोडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर)