घोटी : शहरातील जुना महामार्ग व घोटी-वैतरणा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, वाहनचालक आणि नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने दोन्ही रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ मारून नेण्यासाठी आणि आंदोलन दडपण्यासाठी रस्त्याच्या दुरुस्तीचा केवळ देखावा केला आहे. या रस्त्याची पाऊस उघडल्यानंतर दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली; मात्र तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सदर दुरुस्तीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती; मात्र इगतपुरी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ आंदोलकांची दिशाभूल करण्यासाठी या रस्त्यांलगत खड्डे बुजविण्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवले; मात्र वेळेत खड्डे न बुजविल्याने ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले. आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या धार्मिक सणापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ही दुरुस्ती न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
घोटीतील जुन्या महामार्गाची दुरवस्था
By admin | Updated: September 2, 2016 00:08 IST