वणी : मकर संक्रांतीच्या पर्वाला महिन्याचा कालावधी असला तरी ग्रामीण भागात आतापासुनच आकाशात विविध रंगांचे पतंग उडताना दिसत आहे. मोकळी मैदाने, खुल्या जागा या पतंग उडविण्यासाठीचे अनुकुल स्थळ मात्र या मोकळ्या जागांवर रो हाऊसेस, अपार्टमेंट बंगले, कॉलनी उभे राहिल्याने इमारतीची गच्ची व उंचवट्यावरील भाग पतंग उडविण्यासाठीचे पर्यायी माध्यम आहे. पतंग उडविण्यासाठीचा उत्साह सर्व वयोगटात असतो. मकरसंक्र ांत पर्वात तो आवर्जुन दिसुन येतो. मात्र आतापासून लहान मुलांचा पतंग उडविण्याला आतापासूनच सुरूवात झाली आहे. आकाशात डौलदारपणे दिमाखाने उडणारे पतंग कापाकापीसाठी एकाग्रतेने डावपेच आखण्यात येतात. ही झाली पतंग उडविण्याची हौस मात्र ही स्पर्धा पाहणारी लहान मुले यांना कापाकापीत कोण जिंकतो कोण हरतो याच्याशी देणेघेणे नसते त्यांचे लक्ष फक्त कापलेल्या पतंगावर असते. पतंग कापला की आकाशातुन हा पतंग जमिनीवर वा आणखी अन्य ठिकाणी कोठे पडतो याचा अंदाज लहान मुलांचे समुह घेतात व तो पतंग मिळविण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यामागे धावतात. रस्त्याच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष करून हातात एक मोठी काठी घेऊन पतंग मिळविण्यासाठी इकडुन तिकडे धावतात. काही वेळा विद्युत तारांवर अडकलेला पतंग काठीच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशावेळी शॉर्टसर्किट किंवा विजप्रवाहाचा धक्का लागुन दुर्घटना होऊ शकते. मात्र देहभान विसरून स्वत:चा जीव धोक्यात घालुन पतंग मिळविव्यासाठीचे थ्रील जीवापेक्षा मोठे असल्याची भावना बळावल्याने लहान: मुलांची ही स्पर्धा जीवघेणी ठरू शकते.
ग्रामीण भागात आतापासूनच पतंगबाजीला उधाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:53 IST