संजय पाठक, नाशिक - गेल्या तीन चार महिन्यांपासून हा नेता तिकडे चालला ताे तिकडे चालला अशा अफवा शिवसेनेच्या बाबतीत उठवल्या जात आहेत.उद्धव ठाकरे व संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठवणे बाकी आहे, अशा शब्दांत उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली. कितीही अफवा पसरवल्या तरी नाशकातील शिवसैनिक हा जागेवरच आहे.संघर्ष करत घाव झेलत आहे. अशी स्थिंती तर बाळासाहेबांनीही बघितली आहेत. त्यामुळे आता चर्चा न करता पक्ष मजबुतीसाठी सर्वांनी १६ तारखेेला हाेणाऱ्या मेळाव्यातून आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी केले.
येत्या १६ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.त्या मेळाव्याच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना खा.राऊत बाेलत हाेते. व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल,सुधाकर बडगुजर,अद्वय हिरे, अशाेक धात्रक,संपर्कप्रमु जयंत दिंडे,खासदार राजाभाऊ वाजे,सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,राज्य संघटक विनायक पांडे,जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी,नितीन आहेर,गणेश धात्रक,कृणाल दराडे,महानगरप्रमुख विलास शिंदे,माजी आमदार वसंत गीते,आनिल कदम आदी उपस्थित होते.