नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घालणाऱ्या मनसेच्या सत्ताधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा पुढे करीत रोजगाराची मागणी पुढे केली. त्याला सर्वच पक्षांनी साथ देत परप्रांतीय ठेकेदारांपेक्षा स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे मनसेला टोले लगावतच हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे पालिकेत सुरक्षारक्षकांबरोबरच सर्व प्रकारच्या रिक्त जागांवर तातडीने भरती मोहीम राबवावी, असे आदेश महापौर अॅड. यतिन वाघ यांनी प्रशासनाला दिले आहेत.रुग्णालयांमधील अर्भक चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील पालिकांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या विविध प्रसूतिगृहांमध्ये १५५ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव होता. तथापि, सदरचे काम एका ठेकेदार कंपनीला अगोदरच देण्यात आले असून, त्याची मुदत संपत असल्याने हा प्रस्ताव मांडताना सुमारे अडीच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा त्यात अंतर्भाव होता. परंतु नगरसेवकांनी त्यास कडाडून विरोध केला. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना ठेकेदाराला एवढी रक्कम देण्याची गरज नाही. तसेच उच्च न्यायालयाचे केवळ नाशिक महापालिकेला आदेश नाहीत. अर्भक सुरक्षितताच हवी असेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले किंवा केवळ प्रवेशद्वारावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले तरी काम होऊ शकते, त्यासाठी ठेकेदार पोसण्याची गरज काय, असा प्रश्न बहुतांशी सदस्यांनी केला.ठेकेदाराकडील कामगार मागच्या दाराने पालिकेच्या सेवेत कायम होतात, असा अनुभव असल्याने पालिकेनेच भरती मोहीम राबवून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी मनसेच्या अनिल मटाले यांनी केली. त्यानंतर सर्वपक्षीयांनी त्यास दुजोरा दिला. केवळ प्रसूतिगृहच नव्हे, तर उद्याने आणि अन्य मिळकतींमध्येदेखील सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच पालिकेत अन्य पदे रिक्त आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायासाठी राज ठाकरे लढतात, मग पालिकेत स्थानिक भूमिपुत्रांची भरती का करीत नाही, असा प्रश्न विरोधकांनी केला. त्यानुसार महापौर अॅड. यतिन वाघ यांनी पालिकेच्या सुरक्षारक्षकपदासाठी मानधनावर भरतीप्रक्रिया राबवावी, तसेच पालिकेतील अन्य रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने राबवावी, असा निर्णय दिला. यावेळी झालेल्या चर्चेत उद्धव निमसे, अरविंद शेळके, यशवंत निकुळे, प्रा. देवयानी फरांदे, प्रा. कविता कर्डक, प्रा. कुणाल वाघ, दिनकर पाटील, सुजाता डेरे, शशिकांत जाधव, रंजना पवार, प्रकाश लोंढे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
पालिकेत आता स्थानिकांना रोजगार
By admin | Updated: July 18, 2014 00:36 IST