आनंद खरे
आफ्रिकेच्या या दोन्हीही संघाच्या पराभवामुळे आता विश्वचषकाची टक्कर केवळ अमेरिका आणि युरोप खंडामध्येच रंगेल. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ४ व ५ जुलैला दोन-दोन उपउपांत्य सामने होतील. आत्तापर्यंतची लढाई बघता अमेरिका आणि युरोप खंडातील संघानी एकमेकांना सारखीच टक्कर दिलेली आहे. या चार उपउपांत्य सामन्यात पोहोचणाऱ्या आठ संघांपैकी सहा संघांची नावे निश्चित झालेली आहेत. यामध्ये ब्राझील, कोलंबिया, कोस्टारिका या अमेरिका खंडातील संघांचा प्रवेश झालेला आहे. तर नेदरलॅण्ड, फ्रान्स, आणि जर्मनी या तीन युरोपीय संघांचाही प्रवेश निश्चित झालेला आहे. त्यामुळे तीन-तीन अशा बरोबरीत अर्जेंटीनाचा प्रवेश निश्चित मानला जात असल्यामुळे अमेरिकन संघाची संख्या चार होईल मात्र आठव्या जागेसाठी युरोपचा बेल्जीयम सरस ठरतो की अमेरिका खंडाचा अमेरिका संघ याचा फैसला झाल्यावर कोणाचे वर्चस्व असेल हे स्पष्ट होईल.