धननाशिक : सामान्यत: वादळी वारा आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्यानंतर ती कोणी उचलावी याबाबत पालिकेतच मतभेद असल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. परंतु त्यावर पालिकेने तोडगा काढला असून, सहा विभागात सहा एजन्सी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या एजन्सींना पडलेला लाकूडफाटा देण्यात येणार आहेच, परंतु त्यांना कोणताही मोबदला न देता उलटपक्षी त्यांच्याकडून स्वामित्वधन घेतले जाणार आहे.महापालिका हद्दीत एरव्ही घरातील वृक्ष तोडल्यानंतर किंवा छाटणी केल्यानंतर या फांद्या उचलून नेण्यासाठी उद्यान विभागाच्या ट्रक आहेत. परंतु वादळी वारा सुटल्याने किंवा जोरदार पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. कित्येकदा फांद्याही रस्त्यावर पडतात. त्या नेण्यासाठी मात्र कोणतीही सोय नाही. रस्त्यावर झाड पडल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे तातडीने उपाययोजना म्हणून तुटलेले झाड हटवून रस्ता मोकळा केला जातो. मात्र कापलेल्या फांद्या आणि झाडांचे बुंधे तेथेच पडलेले असतात. त्याला कोणीही वाली नसल्याने ते तसेच पडून राहतात. कित्येकदा या लाकूडफाट्याची चोरी होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता सहा विभागात सहा एजन्सी नियुक्त करण्याची तयारी चालवली आहे. मात्र, अशा प्रकारचा लाकूडफाटा जेथे आहे आणि जसा आहे तेथून उचलून नेण्यासाठी महापालिकेला कोणताही खर्च येणार नाही तर लाकूडफाटा उचलणाऱ्या ठेकेदारांनाच तो घेतल्याबद्दल महापालिकेला जळाऊ लाकडाच्या दराप्रमाणे स्वामित्मधन महापालिकेस अदा करावे लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रभार अधीक्षक महेश तिवारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
आता तुटलेली झाडे उचलण्यासाठी एजन्सी
By admin | Updated: July 14, 2016 01:19 IST