हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लहान, परंतु राजकीय दृष्टीने मोठी मानली जाणारी निरगुडे-बेलपाली या ग्रुप ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. ज्येष्ठ नेते अशोक गुंबाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कौशल्या भोये पूर्ण बहुमतात विजयी होत सरपंचपदी विराजमान झाल्या, तर भारत खोटरे हे बिनविरोध उपसरपंच झाले.सात सदस्य असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कौशल्या भोये, मिथुन राऊत, जयश्री भोये, कमल तुंगार, तारा राऊत, निवृत्ती भोये, भरत खोटरे यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंच निवडीसाठी आज विशेष बैठक बोलवण्यात आली होती. यावेळेस सरपंचपदासाठी कौशल्या भोये व कमल तुंगार यांनी सरपंचपदासाठी नामांकन पत्र सादर केले. परंतु सरपंच निवडणूक ही गुप्त मतदानपद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित सदस्य मिथुन राऊत यांनी केली. त्यानंतर सात सदस्यांपैकी पाच सदस्यांनी मतदान प्रक्रि या पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील बोरसे यांनी कौशल्या भोये यांना विजयी घोषित केले, तर उपसरपंचपदी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख भारत खोटरे यांना घोषित करण्यात आले. यावेळी हरसूल सरपंच जनार्धन पारधी, ग्रामपंचायत सदस्य नितीन लाखन, दत्तात्रय व्यवहारे, काशीनाथ वळवी आदि उपस्थित होते.
निरगुडे सरपंचपदी कौशल्या भोये
By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST