निफाड : अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त... अशा जयघोषात निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरू दत्तात्रेयांची जयंती मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आली.श्री दत्तजयंती निमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळपासून भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती. दुपारी श्री गुरु चरित्र ग्रंथातील दत्त जन्माचा अध्याय वाचून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक महानैवैद्य व आरती विजय गोल्हार यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यानंतर सेवा केंद्राचे प्रमुख वि .दा. व्यवहारे यांनी उपस्थित सेवेकरी भाविकांना श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व दत्तात्रेयाविषयी मार्गदर्शन केले. दत्तजयंती निमित्त सेवा केंद्रात नाम जप यज्ञ सप्ताह सुरु आहे. सप्ताहात सेवेकरी भाविकांनी श्री गुरु चरित्र,श्री नवनाथ सार ग्रंथ,श्रीपाद वल्लभ चरित्र, श्री स्वामी चरित्र ,दुर्गासप्तशती, मल्हारी माहात्म्य या ग्रंथांचे पारायण केले. अनेक सेवेकरी भाविक पारायणाला बसले आहेत. या केंद्रात गुरूवारी (दि.१२) नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे. त्याचबरोबर निफाड येथील पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या दत्तमंदिरातजयंती साजरी करण्यात आली. या निमित्त भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिंपी गल्ली येथील पुरातन दत्त मंदिर,माणकेश्वर चौकातील गोसावी वाडयातही पारंपरिक पद्धतीने दत्तजयंती साजरी करण्यात आली.
निफाडला दत्त नामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:20 IST
जयंती उत्सव : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
निफाडला दत्त नामाचा जयघोष
ठळक मुद्देकेंद्रात गुरूवारी (दि.१२) नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे