नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील तासिका मानधन कर्मचारी व कंत्राटी शिक्षक कर्मचारी संघटनेने आदिवासी विकास विभागासमोर बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. १० फेब्रुवारी रोजीच यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आदिवासी विकास विभागाला बेमुदत उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला होता. याआधी याच संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी २३ ते ३० डिसेंबर २०१४ दरम्यान आदिवासी विकास विभागासमोर बेमुदत उपोषण केले होते. अखेर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न धसास लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. निर्णय होत नसल्याने बुधवारपासून पुन्हा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काल दुपारी प्रभारी आदिवासी विकास अपर आयुक्त सुधाकर गायकवाड व सहआयुक्त अशोक लोखंडे यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांच्या वतीने रितेश ठाकूर, संदीप भाबड, एस. पी. गावित, केशव ठाकरे, विलास पाडवी यांच्या शिष्टमंडळाची दुसऱ्यांदा चर्चा झाली. मात्र त्यात ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा हे शुक्रवारी सायंकाळी नाशिकला मुक्कामी येत असून, त्यांनी चर्चेसाठी बोेलाविल्यास आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ चर्चेला जाण्यास तयार असल्याचे रितेश ठाकूर व संदीप भाबड यांनी सांगितले. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी सटाणा येथील मुलींच्या वसतिगृहातील समस्येबाबत एका शिष्टमंडळाने आदिवासी विकास विभागासमोर उपोषण केले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ आंदोलन सुरूच
By admin | Updated: February 27, 2015 00:03 IST