नाशिक : कोरोनाचे व्हेरिअंट जसे रूप बदलतात तसेच आता डेंग्यूच्या एका नवीन व्हेरिएंटचा प्रसार वाढला आहे. डेंग्यूचा नवा व्हेरिएंट डेन्व्ही २ किंवा डी २ हा नवा व्हेरिअंट जास्त धोकादायक असल्याने तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतदेखील या व्हेरिअंटचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळणे नेहमीचे असले तरी या नवीन व्हेरिअंटमुळे चिंता वाढली आहे.
डेंग्यूचा हा नवा व्हायरस साधारणपणे चार रूपांमध्ये आढळून येतो. याला डी१, डी२, डी३ आणि डी४ अशी नावे आहेत. त्यांतील डी२ मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात. त्यामध्ये ताप येणे, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी अशी लक्षणं आढळतात. यातील बरीचशी लक्षणं ही कोविडमध्येही असल्यामुळे निदान करणे अवघड जाते. नवीन व्हेरिअंटवर लवकर उपचार केले नाहीत, तर तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोविडपेक्षा डेंग्यूमध्ये एक समाधानाची बाब म्हणजे तो श्वासाद्वारे पसरत नाही. मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य काळजी घेतली नाही तर हा नवा व्हेरिएंट थैमान घालण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.