नाशिक : ज्येष्ठ गायक व संगीतकार सुरेंद्र व राजेंद्र बुरसे यांनी बसवलेला संपूर्ण नव्या भावगीतांचा ‘सूर बरसे’ हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी (दि. १ एप्रिल) महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, योगेश्वर अभ्यंकर यांसारख्या सिद्धहस्त कवींच्या पण आजवर संगीतबद्ध न झालेल्या रचना ऐकण्याची संधी मिळणार आहे.पारंपरिक भावगीतांऐवजी उपरोल्लेखित दिग्गज कवींसह नाशिकमधील कवी पंढरीनाथ सोनवणे, कवयित्री साधना शुक्ल-राव, सोलापूर येथील मुबारक शेख, पुणे येथील अशोक बुरसे यांच्या अर्थपूर्ण कविता निवडून त्यांना सुरेंद्र बुरसे यांनी संगीतबद्ध केले आहे. अशा संपूर्ण नव्या भावगीतांच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ नाशकातून होत आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात मकरंद हिंगणे, राजेंद्र बुरसे, गौरव बुरसे, स्नेहल बुरसे, अनुराधा पाठक, प्राची चाफेकर, अपर्णा पठाडे गायन करणार आहेत. संहिता व निवेदन श्रीधर पाठक यांचे असून, प्रमोद जांभेकर, दीपक उपाध्ये, साई-पीयूष, सौरभ बुरसे हे संगीतसाथ करणार आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, राजेंद्र जाधव, सुनील परमार उपस्थित होते.
नव्या भावगीतांचे बरसणार सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 23:07 IST