नाशिक : सातपूर पोलिसांच्या कामचुकारपणामुळे एका कामगार महिलेने आत्महत्त्या करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेनंतर सातपूर पोलिसांच्या सुस्त कारभाराबद्दल सगळीकडेच संताप व्यक्त केला जात होता. आता हाच कित्ता पुन्हा सातपूर पोलिसांकडून गिरवला जात असून, महिलांच्या तक्रारीची तसुभरही दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याचे बघावयास मिळत आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सोमेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका गृहिणीला गेल्या काही दिवसांपासून वेळी- अवेळी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून सतत कॉल येत असत. संबंधित व्यक्ती गृहिणीशी अश्लील भाषेत संवाद साधत असल्याने गृहिणीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असे. सततच्या या प्रकारामुळे वैतागून संबंधित गृहिणीने सातपूर पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दाखल केली. याबाबतचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. एम. देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. मात्र महिना उलटूनदेखील तपास शून्य असल्याने पोलिसांच्या कामगिरीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. वास्तविक संबंधित तक्रार ही सायबर गुन्हे शाखेशी संबंधित असल्याने छेड काढणाऱ्या व्यक्तीचा तपास काढणे सहज शक्य आहे. बहुधा दोन दिवसांतच संबंधित मोबाइल क्रमांक कोणाच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा पत्ता काय आहे, तसेच कोणत्या भागात हा क्रमांक कार्यान्वित आहे याबाबतची माहिती मिळवता येते; परंतु पोलिसांची तपास करण्याची मानसिकताच नसल्याने परिसरात गुंडगिरी वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
महिलांच्या तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्षत
By admin | Updated: November 2, 2014 23:54 IST