पंचवटी : भारतीय संस्कृतीत नद्यांना खूप महत्त्व असून, नद्यांमुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. देशाबाहेर गेल्यानंतर आपली ओळख नद्यांमुळे होत असल्याने नद्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार मुन्वर सलीम चौधरी यांनी केले. तपोवनातील सेक्टर येथील पुरी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांच्या मठात आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज, निर्माेही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, १०८ श्री श्री हरिचैतन्य ब्रम्हचारी महाराज आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना चौधरी यांनी पुढे सांगितले की, गंगा गोदावरीची शुद्धता तसेच पवित्रता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली नद्यांमध्ये दूषित पाणी मिसळले जाते. अनेक ठिकाणच्या नदीपात्रालगत भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. नद्यांची गणना व त्यांचे क्षेत्र निश्चित केले जावे यासाठी अनेकदा राज्यसभेत मुद्दा मांडला आहे. आगामी कालावधीत नवा भारत बनविण्यासाठी स्वत:च नद्यांचे तसेच पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे असून कोणताही जातिभेद न करता देशात जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पाणी वापर, नद्यांचे संरक्षण व नद्यांचे पावित्र्य टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. जगद्गुरू अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांनी पूर्वी नदीकाठच्या परिसरात कुंभमेळा भरायचा, आता कुंभमेळ्यासाठी महिनाभर अगोदर पाणी मागवावे लागते. नद्यांमुळेच कुंभमेळ्याची ओळख असून सर्वच भागात नद्यांची परिस्थिती जैसे थे आहे. ज्या गोदावरी नदीमुळे कुंभमेळा होतो ती गोदावरी आज प्रदूषित झालेली आहे. शासनाने नद्यांच्या बाबतीत खोटे बोलू नये. नद्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिक व शासनाची आहे, म्हणून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे सांगितले. हरिचैतन्य महाराज यांनी पाणी बचत करतानाच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरात चांगला संदेश जाईल असे सांगितले. तर महंत राजेंद्रदास यांनी येणाऱ्या काळात नागरिकांनी जागृत राहून नद्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी लक्ष्मण मंडाले, सूर्यकांत रहाळकर, झेंडा महाराज, राजेश पंडित, धीरज बच्छाव, सुभाष सूर्यवंशी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
नद्यांचे प्रदूषण रोखणे गरजेचे
By admin | Updated: September 2, 2015 23:53 IST