स्वप्निल जोशी नाशिकबदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे करण्यात येणारे अनुकरण यामुळे हृदयविकार दिवसेंदिवस बळावत चालला आहे. पूर्वी चाळीस वर्षांनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता युवापिढीत म्हणजे तिशीच्या आतील युवकांनाही येत असल्याचे आढळत आहे. हृदयविकाराला दूर ठेवायचे असल्यास आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.बदलत्या जीवनशैली बरोबरच शारीरिक श्रमात घट, त्या तुलनेत वाढणारे ताण-तणाव आणि व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण यामुळे हृदयविकारदेखील वाढू लागले आहेत. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब तपासणी, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल (चरबी), वजन आदिंची तपासणी करणेदेखील महत्त्वाचे आहे, असे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.हृदयविकार शस्त्रक्रियेत कार्डियाक स्टेण्ट या वैद्यकीय उपकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. या स्टेण्टची आयात करावी लागत असल्याने याच्या देशभरात विविध ठिकाणी भिन्न किमती आढळून येतात. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेचा खर्च सामान्य रुग्णाला परवडत नाही, ही बाब खरी असली तरी स्टेण्ट या वैद्यकीय उपकरणाचे औषध मूल्य नियंत्रण सूचीत ‘अत्यावश्यक औषधां’मध्ये समावेश करण्याची शिफारस अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांनी राष्ट्रीय औषधनिर्माण मूल्य प्राधिकरणाकडे केली आहे. या निर्णयाबाबत दिल्ली येथे शुक्रवारी (दि. ३०) बैठक अपेक्षित असून रविवारी (दि. २) यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.शस्त्रक्रिया पद्धतीत सुधारणा होणे आवश्यकराज्य शासनाच्या वतीने हृदयविकार शस्त्रक्रिये-साठी सवलत देण्यात येत असली तरी बदलत्या तंत्रज्ञानानुसार या शस्त्रक्रिया पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे पालन करणे आवश्यक आहे. आहार-विहार-औषधे- शारीरिक श्रम या चतु:सूत्रीचा दैनंदिन आयुष्यात उपयोग होणे आवश्यक आहे. तरच हृदयविकारापासून दूर राहता येते.- डॉ. मनोज चोपडा,हृदयरोग तज्ज्ञ
सध्याची जीवनशैली बदलण्याची गरज
By admin | Updated: September 29, 2016 00:25 IST