नाशिक : पोलीस अधिकारी-कर्मचारी राज्याच्या पूर्वेकडील नक्षली भागात सेवा करण्याबाबत नाखूष असतात; मात्र नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत सकारात्मकता दाखवून देशसेवेची एक उत्तम संधी म्हणून त्याकडे बघावे आणि स्वत:च्या मनाची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले. पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नक्षली भागातील सेवा करण्याबाबत पोलिसांचा असलेला नकारात्मक दृष्टिकोन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी देशसेवेसाठी कुठल्याही भागात जाण्याची तयारी ठेवून उत्तम संधी म्हणून आपले कौशल्य दाखवून आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. यावेळी माथूर यांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत असलेल्या दृष्टिकोनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणालाही यामधून सूट दिली जाणार नाही. २७ परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांनी आपली मानसिकता तयार करावी आणि आतापासूनच तेथे सेवा बजावण्याबाबत स्वत:ला सज्ज ठेवावे, अशा सूचनेतून इशारा दिला. प्रशिक्षण केंद्रात मूलभूत शिक्षण देत अधिकारी घडविण्याची जबाबदारी अकादमीवर असते. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी अकादमीमध्ये नियुक्ती घेत सेवा कार्य बजवावे, असेही माथूर म्हणाले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अकादमीच्या नूतन संचालक अश्वती दोरजे, सहसंचालक जालिंदर सुपेकर, मंजुला माथूर, रोहिणी दराडे आदी उपस्थित होते.दरम्यान, माथूर यांच्या हस्ते नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच अकादमीच्या आवारात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी वनमहोत्सवाला हातभार म्हणून वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक राहण्याचा संदेश पोलीस दलाला दिला.
नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 16:27 IST
पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली
नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर
ठळक मुद्देनव्या संकेतस्थळाचे अनावरण‘वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घ्या’