नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोड सहा प्रभागातील २३ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर १७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग १९ ब मधून मनसेच्या कल्पना बोराडे व प्रभाग २० क नगरसेविका सविता दलवाणी, ड गटातून उल्हास गोडसे या राष्ट्रवादीच्या दोघा अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली. मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी शिवसेना, भाजपाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी उमेदवारी न मिळालेल्या इतर इच्छुकांची मनधरणी करून त्यांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी सकाळपासून खटाटोप सुरू होता. नाराजांना विविध प्रकारे राजी करण्यासाठी तसेच निवडणुकीत अडचणीचे ठरणारे अपक्ष उमेदवार यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजकीय पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी नानाविध प्रयत्न करत होते. प्रभाग १९ ब मधुन मनसेच्या अधिकृत उमेदवार कल्पना कैलास बोराडे यांनी माघार घेतली. तर प्रभाग २० अ व ब गटात कॉँग्रेसने उमेदवारीच न दिल्याने २० क गटात भाजपामधुन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेविका सविता दलवाणी व ड गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार उल्हास गोडसे यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. त्यामुळे २० ब व क गटात शिवसेना, भाजपा अशी दुहेरी लढत होणार आहे. प्रभाग १९ अ मधुन राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिष भडांगे अपक्ष उमेदवारी करत आहे (प्रतिनिधी)
दोन अधिकृत उमेदवारांच्या माघारीने राष्ट्रवादीला धक्का
By admin | Updated: February 8, 2017 00:58 IST