संजीव धामणे
नांदगावअलग पहचान बनाए,बीएसएनएल अपनाए।दूरसंचार निगमच्या अधिकाऱ्यांना रिंग दिली असता, त्यांच्या मोबाइलवरून ऐकु येणाऱ्या वरील पंक्तींच्या अगदी उलट कारभार नांदगावच्या बीएसएनएलचा सुरू आहे. ‘अपनाए’च्या ऐवजी ग्राहक दूर भगाए अशी सध्याची स्थिती आहे. दिवसेंदिवस मोबाइल सेवा ढेपाळत आहे. थ्रीजी सेवा देणे दूरच; परंतु आहे ती टूजी सेवादेखील सुरळीत मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील सर्व लाइन्स व्यस्त आहेत... पहिल्या रिंगला आउट आॅफ कव्हरेज दाखवून दुसऱ्या रिंगला कॉल लागणे, असे प्रकार सर्रास सुरूआहेत. तसेच इंटरनेट न उघडणे... उघडलेच तर गतिमंद असणे. थोड्या वेळाने रिट्राय असा मेसेज येणे. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.याउलट इतर कंपन्यांचे थ्रीजी कनेक्शन्स असल्याने त्यावर नेटमधून मजकूर, जेपीजी व इतर फाईल्स चटकन डाउनलोड होणे. विविध प्रकारच्या अॅप्सची कार्यक्षम सेवा मिळणे या सुविधा कार्यक्षमतेने मिळत असल्याने बीएसएनलचा ग्राहकवर्ग खासगी कंपन्यांकडे स्थलांतरित होत आहे.यासंदर्भात येथील पत्रकारांनी बीएसएनएलच्या कार्यालयास भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक उपविभागीय अधिकारी वाय. बी.जाधव, कनिष्ठ अभियंता मोराणकर उपकरणांच्या अभावामुळे हतबल असल्याचे दिसून आले. विभागीय अभियंता प्रदीप देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुसरे विभागीय अभियंता विसपुते यांच्याकडे बोट दाखवले; मात्र त्याचवेळेस वरिष्ठ अधिकारी उपमहाव्यवस्थापक सैंदाणे यांच्याशी बोला, असा सल्लाही पत्रकारांना दिला. सैंदाणे यांनी सरकारी खाक्याप्रमाणे आपल्या कोर्टातला चेंडू कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे टोलवला. नांदगाव येथे टूजीची दोन बीटीएस यंत्रे आहेत. वरिष्ठांकडे जात असलेल्या प्रत्येक नोंदीमध्ये ही यंत्रणा अपूर्ण पडत असल्याची माहिती जात असते. कॉल न लागणे, नेट न मिळणे यामागे व्हॉइस ट्रॅफिक व डाटा ट्रॅफिकची कोंडी हे प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ रहदारी वाढली परंतु रस्ता पूर्वीचाच आहे. त्यासाठीच थ्रीजीची आवश्यकता आहे. येथे १२ टीआरई आहेत. एक टीआरई म्हणजे आठ चॅनल्स. ते वाढविण्याची आवश्यकता आहे. १५० ते २०० एर्लांग एवढी येथील दूरसंचार रहदारी आहे. ती येथील यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मोबाइल सेवेसंदर्भात लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी नागरिकांना आंदोलन करावे लागले होते. (वार्ताहर)