नांदगाव : आजोबांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी नांदगाव येथील महसूल विभागाच्या लिपिकाने साथीदाराच्या मदतीने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाने गुरुवारी (दि. ५) रात्री केली आहे. दरम्यान, एक महिनाआधी तलाठी विलास बागुल याने ६०० सहाशे रुपयांची लाच स्वीकारली होती.
एका महिन्यात नांदगाव महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांवर नाशिक लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने महसूल विभागातील कारभाराची भ्रष्ट कामाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. तक्रारदारांनी (रा. सिन्नर) लाचलुचपत विभागाला केलेल्या तक्रारीत समाधान निंबा पवार याने नितीन अण्णा सोनवणे याच्या मदतीने तक्रारदारांचे आजोबा यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या जमिनीवर आजोबांचे नाव लावण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ती स्वीकारताना या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार व अभिजित पाटील, पोलीस नाईक प्रकाश डोंगरे, पोलीस नाईक मनोज पाटील, प्रणय इंगळे आदींनी ही कारवाई केली.