नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यान साकारण्यात येणा-या ‘स्मार्ट रोड’ला मनसेच्या दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.२०) झालेल्या महासभेत केली. दरम्यान, सर्वपक्षीय पदाधिका-यांमार्फत सुरेखा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन महासभा तहकूब करण्यात आली.महापालिकेच्या महासभेत प्रारंभी राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी सांगितले, भोसले यांच्या रिक्त होणा-या जागेवर होणा-या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसप्रमाणेच राष्टवादीही उमेदवार उभा करणार नाही. भोसले कुटुंबीयातील सदस्याने सभागृहात यावे यासाठी सर्वपक्षीयांनी बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यान साकारण्यात येणा-या स्मार्ट रोडला सुरेखा भोसले यांचे नाव देण्याची मागणी शेलार यांनी केली. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, सुरेखा भोसले या चार टर्म महापालिकेत निवडून आल्या होत्या. परंतु, त्यांच्या निधनाची प्रशासनाने साधी दखल घेतली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. महापालिकेकडून त्यांच्या निधनाबाबतची माहिती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवायला हवी होती. प्रशासनाकडूनही त्यांना आदरांजली वाहणे आवश्यक होते. महापालिकेचे अर्धा दिवस कामकाज थांबवता आले असते. यापुढे सभागृहाचा सदस्य असताना अशी दुदैवी घटना घडल्यास त्याला शासकीय इतमामात निरोप देण्याबाबत आचारसंहिता तयार करण्याची सूचनाही बग्गा यांनी केली. विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनीही प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कोरडे ओढले आणि त्याबाबत आचारसंहिता बनविण्याची मागणी केली. सभागृह हे कुटुंब आहे आणि कुटुंबातीलच सदस्य गेल्याने सभागृहाचे मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनीही अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत त्यांना मानवंदना देण्याची गरज होती शिवाय, महापालिकेकडून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व्हायला हवी होती, असे सांगत यापुढे सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी प्रशासनाकडून सदस्यांना निरोप न गेल्याने नगरसचिव व जनसंपर्क विभागाला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली तर स्मार्ट रोडला भोसले यांच्या नावाला अनुमती दर्शविली. यावेळी कल्पना पांडे, दिनकर आढाव, अजिंक्य साने यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. महापौर रंजना भानसी यांनी यावेळी झाल्या प्रकाराबाबत प्रशासनाला संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आणि स्मार्ट रोडला सुरेखा भोसले यांचे नाव देण्याची घोषणा केली.
नाशिकच्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या ‘स्मार्ट रोड’ला मनसेच्या दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 17:14 IST
महापौरांची घोषणा : सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजलीनंतर महासभा तहकूब
नाशिकच्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या ‘स्मार्ट रोड’ला मनसेच्या दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांचे नाव
ठळक मुद्देभोसले यांच्या रिक्त होणा-या जागेवर होणा-या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसप्रमाणेच राष्टवादीही उमेदवार उभा करणार नाही निधनाची प्रशासनाने साधी दखल घेतली नसल्याबद्दल खंत व्यक्त