मुस्लीम संघटना देणार सिंहस्थात योगदाननाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून, या महिन्याच्या २९ तारखेला पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी पार पडणार आहे. दरम्यान, सिंहस्थामध्ये येणाऱ्या भाविकांना जुने नाशिक परिसरातून गोदावरीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच फळे, फराळाचे खाद्यपदार्थ, पाणी व प्रथमोपचारासारख्या सेवा पुरविण्यासाठी जुन्या नाशकातील काही मुस्लीम संघटनांनी पाऊल उचलले आहे. दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकची जागतिक स्तरावरची ओळख आहे. यामुळे कुंभमेळा यशस्वीरीत्या पार पाडला जावा आणि लोकोत्सवाचा आदर्श संपूर्ण देशाने घ्यावा, यासाठी नाशिककर या नात्याने जात, धर्म विसरून केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून भाविकांच्या सेवेचे व्रत काही मुस्लीम संघटना पार पाडणार आहे. जुने नाशिकमधील द्वारका-अमरधाम रस्त्याने थेट रामकुंड व तपोवनाकडे जाता येते. त्यासाठी बागवानपुरा येथील शेख सलीम अब्बास विचार मंचाच्या वतीने भाविकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मंचाचे बहुसंख्य युवा स्वयंसेवक यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या शाहीस्नानाच्या तीनही पर्वणींच्या काळात मुस्लीम संघटनांनी शेकडो कार्यकर्ते, द्वारका, बागवापुरा, अमरधामरोड, नानावली, टाळकुटेश्वर पूल आदि ठिकाणी स्वयंस्फूर्तीने भाविकांना मदत करणार असल्याचे मंचाचे अध्यक्ष इम्रान पठाण यांनी सांगितले. भाविकांना पोलीस, वैद्यकीय, प्रशासन आदि सोयी-सुविधांसाठी मार्गदर्शन करणार आहे. गरजू भाविकांना तातडीने आवश्यक ती सेवा कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी मुस्लीम कार्यकर्ते या भागात प्रयत्नशील राहणार आहेत. पर्वणीकाळात द्वारका-अमरधाम रोडवर कुठल्याही प्रकारची वाढीव अतिक्रमणे होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. रस्त्यावर शक्यतो वाहने लावू नये, जेणे करून भाविकांना मार्गस्थ होताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
मुस्लीम संघटना देणार सिंहस्थात योगदान
By admin | Updated: August 9, 2015 00:17 IST