नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दिवाळी पाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मुहूर्तावर शहरातील गृह व वाहन बाजारात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकांनी दुचाकी, चारचाकीसह इलेक्ट्रॉनिक घरगुती वस्तू, सदनिका खरेदी करत मुहूर्त साधणार आहेत. शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रकल्पाला आगाऊ भेटी देत चौकशी करून माहिती जाणून घेतली. काहींनी सदनिकांची नोंदणी केली आहे, तर काही ग्राहक पाडव्याच्या मुहूर्तावर नोंदणी करणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विविध दुचाकी-चारचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनदेखील दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर निवडक उत्पादनांची जाहिरात करत दुचाकी-चारचाकींच्या विविध सोयीसुविधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुचाकी-चारचाकींच्या दालनांमध्ये नागरिक ांची धनत्रयोदशीपासून खरेदीसाठी गर्दी झाली आहे. दरम्यान, तरुणी व महिलांनी नेहमीप्रमाणे मोपेड दुचाकीलाच सर्वाधिक पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, तर तरुणांनी गियर बाईकच्या खरेदीला प्राधान्य दिले. एकूणच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज पाडव्याला वाहन, गृह, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात मोठी विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक दिवस अगोदर वाहन व गृह बाजारात खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला भरते आले होते. (प्रतिनिधी)
आज खरेदीचा साधणार ‘मुहूर्त’
By admin | Updated: November 11, 2015 23:23 IST