राजाराम लोंढे - कोल्हापूरकाँग्रेसकडील महामंडळांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त सापडला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसकडील २१ पैकी १८ महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या असून एक राज्यमंत्री पदही रिक्त ठेवले आहे. देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासारखे विभागीय पातळीवरील पदही अंतर्गत गटबाजीमुळे रिक्त राहिले आहे. लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीने कात झटकून आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिथे गरजेचे आहे त्याठिकाणी पॅचवर्क करून विधानसभेची जागा सुरक्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केला आहे. महामंडळांबाबत कोल्हापूर राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता होती. पूर्वी एस.टी.महामंडळ जिल्ह्याला मिळाले होते ते मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. एस. टी. महामंडळाच्या संचालकपदी ए. वाय. पाटील यांची नियुक्ती केलीच, पण त्याचबरोबर या पदासाठी इच्छुक असलेले भैया माने, धैर्यशील माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पक्षकार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांचेही पुनर्वसन केले. काँग्रेसने दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या संचालकपदी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी नियुक्ती केली होती. त्याचबरोबर देवस्थान समितीचे अध्यक्षपदही कॉँग्रेसकडेच होते. त्यातील एकही पद पुन्हा जिल्ह्याला मिळालेले नाही. देवस्थान समितीचे अध्यक्षपद हे विभागीय असतानाही अंतर्गत वादामुळे कॉँग्रेसला भरता आलेले नाही. जिल्ह्यात कॉँग्रेसचे दोन आमदार आहेत, इतर मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी महामंडळासह विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या महत्त्वपूर्ण होत्या. त्याही करण्यात कॉँग्रेस नेत्यांना अपयश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा करून महामंडळ नियुक्तीचा तिढा बऱ्यापैकी सोडविला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रित यादी जाहीर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. जुन्या आमदारांना कॅबिनेट दर्जाचे महामंडळ, तर नवीन आमदारांना राज्यमंत्री दर्जाचे महामंडळ देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे, पण यासाठी अनेक आमदार इच्छुक असल्याने एकमत होत नसल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. महामंडळ नियुक्तीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे प्रयत्नशील आहेत. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पण मध्यंतरी काहीतरी अडचणी येत असल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. काहीकरून आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या पूर्ण करण्यासाठी कॉँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. - अॅड. सुरेश कुराडे (प्रदेश सरचिटणीस, कॉँग्रेस) चौदा वर्षे मंत्री पदे रिक्त !-दिवंगत नेते विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असल्यापासून काँग्रेसच्या वाट्याची तीन मंत्रिपदे रिक्त होती. चौदा वर्षे ही पदे रिक्त ठेवून कॉँग्रेस नेतृत्वाने नेमके काय साधले, हा संशोधनाचा विषय आहे. -तीन महिन्यांपूर्वी यातील दोन मंत्रिपदे अमित देशमुख व अब्दुल सत्तार यांना देऊन त्यांचे पुनर्वसन केले. अजूनही एक राज्यमंत्री पद रिक्त आहे. राणेंच्या बंडाने अडचणी वाढल्या-कॉँग्रेसची वाट न पाहता राष्ट्रवादीने महामंडळाच्या नियुक्त्या सुरू केल्याने कॉँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या होत्या. -येत्या आठ दिवसांत बहुतांशी नियुक्त्या केल्या जाणार होत्या. तोपर्यंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बंड केल्याने आता अडचणी वाढल्या आहेत.- २५ आॅगस्टला विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत निवडी करण्यासाठी कॉँग्रेसमधील एक गट प्रयत्नशील आहे.
काँग्रेसला महामंडळाच्या निवडीला मुहूर्त लागेना
By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST