नाशिक : अनेक महिन्यांनंतर आलेला गुरुपुष्यामृत, अधिक मासाची समाप्ती व कुंभपर्व असा तिहेरी जुळून आलेला योग साधत नाशिककरांनी आज सोने-चांदी व पुष्कराज खड्यांची मनसोक्त खरेदी केली. यानिमित्त शहरातील सराफी पेढ्या गजबजून गेल्या होत्या. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरातही सुमारे दोनशे रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही जणू ‘पर्वणी’च ठरली. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त दुपारी २.४८ ते उद्या सूर्योदयापर्यंत असला, तरी आज सकाळपासूनच शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गर्दी होती. सध्या लग्नसराई व सणवार नसल्याने बहुतांश ग्राहकांनी दागिन्यांऐवजी चोख सोने खरेदीला पसंती दिली. त्यामुळे वेढे, नाणी यांची अधिक विक्री होत होती. मुहूर्तावर सोने घेऊन लग्नसराईत त्यांचे दागिने घडवण्याच्या उद्देशाने खरेदी सुरू होती. दुपारी पावणेतीननंतर ग्राहकांची गर्दी आणखी वाढली. सायंकाळी तर अनेक सराफी दुकानांत पाय ठेवण्यासह जागा शिल्लक नव्हती. दागिन्यांमध्ये ग्राहकांची मंगळसूत्रे, कानातले व बांगड्यांना अधिक पसंती लाभत होती. आजच्या दुर्मिळ मुहूर्ताला सोन्याच्या घटलेल्या दराची जोड लाभल्याने जणू दुधात साखरच पडली. गेल्या आठवड्यात २६ हजार ५०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान असलेले सोने आज २६ हजार २०० ते ३०० रुपये प्रतिग्रॅम दराने उपलब्ध होते. पुष्कराज खड्याच्या खरेदीसाठीही गुरुपुष्यामृत योग हा महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कुंडलीनुसार व ज्योतिषाच्या सल्ल्याने या खड्याची खरेदी सुरू होती. त्याचे भाव कॅरेटवर अवलंबून असले, तरी साधारणत: १ हजार ते १५ हजारांपर्यंत हे खडे उपलब्ध होते. याशिवाय चांदीच्या खरेदीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिक घाटाचे चांदीचे ताट, वाटी, चमचे अशी भांडी उत्साहात खरेदी केली जात होती. (प्रतिनिधी)
मुहूर्ताला दर घसरणीची झळाळी
By admin | Updated: July 17, 2015 00:55 IST