नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी मनसेचे सलिम शेख यांची निवड होऊन समितीवर महाआघाडीने आपले वर्चस्व कायम राखले. सलिम शेख यांनी शिवसेना-भाजपा पुरस्कृत रिपाइंचे प्रकाश लोंढे यांचा ११ विरुद्ध ५ अशा मताधिक्याने पराभव केला. महापौरपदाच्या निवडणुकीपासून असलेल्या महाआघाडीत मनसेसोबत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्ष आघाडी कायम राहिली. कॉँग्रेसमध्ये मात्र पाठिंबा देण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये अखेरपर्यंत घोळ सुरूच राहिल्याने दोघा सदस्यांनी मात्र शेख यांच्या पारड्यात आपले मत टाकत आघाडी धर्म पाळला. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी अपर महसूल आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतिपदासाठी मनसेचे सलिम शेख, भाजपाचे दिनकर पाटील आणि रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी सभागृहात मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष आघाडी यांचे सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिल्यानंतर पाच मिनिटांनी सेना, भाजपा आणि रिपाइंचे सदस्य सभागृहात अवतरले. यावेळी भाजपाचे दिनकर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे सलिम शेख आणि रिपाइंचे प्रकाश लोंढे यांच्यात सरळ सामना झाला.
स्थायी सभापतिपदी मनसेचे सलिम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 23:34 IST