येवला : शहराला पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करावा, या मागणीसाठी तिघा नागरिकांनी येवला पालिकेसमोर बुधवारी उपोषण केले. येवल्याचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर तक्ते, संजय जाधव, अशोक संकलेचा हे तिघेजण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, पाटबंधारे खात्याशी विचारविनिमय करून, पाण्याचा अंदाज घेऊन, येवला नगरपरिषद पाणीपुरवठा समितीच्या विचार- विनिमयाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे व मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्याने माजी नगराध्यक्ष रत्नाकर तक्ते यांच्यासह तिघांनी उपोषण मागे घेतले. येवला पालिकेला आठ दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याबाबत निवेदन दिले होते. तालुक्यात परतीच्या पावसाने धरणात पाणी साठ पुरेसा आहे.शिवाय पालखेड चे पाणी आवर्तनाने साठवण तलाव देखील भरला आहे. अशा परिस्थितीत पालिकेने 3 दिवसाआड करावा, अश्ी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. घटस्थापना, दसरा, दिवाळी या सनासुदीच्या दिवसात शहरवासियांना पुरेसे पाणी मिळावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. साठवण तलावा भोवती असलेल्या १०९ विहिरी मधून पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत असून तो थांबविण्याची मागणीही होत आहे. तसेच परिसरातील विहिरीवरील थ्री फेज विजेचे कनेक्शन तत्काळ बंद करावे, विहिरी अधिग्रहित कराव्यात अशी मागणी अशोक संकलेचा सह उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. दिवसभरात या उपोषणस्थळी पदाधीकारी न आल्यामुळे उपोषणकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
तीन दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन
By admin | Updated: October 9, 2015 00:16 IST