नामपूर : येथील शिवमनगर परिसरातील घरातील पाण्याच्या टाकीत पडलेल्या एक महिन्याच्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मातेचाही करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घटली. जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.धनश्री प्रवीण पवार (२२) असे दुर्दैवी मातेचे नाव आहे. मयत धनश्री पवारचा सुमारे दोेन वर्षांपूर्वी दुंधे तळवाडे (ता. मालेगाव) येथील प्रवीण पवारशी विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी गरोदरपणामुळे धनश्री नामपूर येथे माहेरी आली होती. सकाळी नळाचे पाणी भरत असताना धनश्रीचा १ महिन्याचा मुलगा यश पाण्याच्या टाकीत पडला. त्याला वाचविण्यासाठी टाकीतून मुलाला बाहेर काढताना तोल जाऊन पाण्यात बुडाल्याने दोघांचाही करुण अतं झाला. धनश्रीची आई बाहेरून घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. घटनेनंतर तातडीने दोघांचे मृतदेह नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी नाशिक येथील सिंहस्थ मिटिंगसाठी गेलेले असल्याने शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह मालेगावला हलविण्यात आले.हमालीचा व्यवसाय करणाऱ्या शिवाजी बोळणीस यांची ती कन्या होय. (वार्ताहर)
पाण्याच्या टाकीत पडून मायलेकाचा मृत्यू
By admin | Updated: July 30, 2015 23:59 IST