नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा मराठवाड्याला सोडण्याच्या निर्णयामुळे शहरातील जलसंकट दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालले असून, मे २०१६ अखेर धरणातील पाण्याची पातळी अवघ्या दहा फुटावर जाणार असल्याचे वास्तव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महासभेत मांडल्याने लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनानेही आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच उद्भवलेल्या या जलसंकटावर मात करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे अधिकार महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुक्तांकडे सोपवले आणि पाणीबचतीसाठी प्रबोधन करण्याबरोबरच नाशिककरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता लागणारा खर्च मनपा निधीतून करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती दर्शविणारे महासभेला दिलेले पत्र वाचून दाखविण्यात आले आणि जून-जुलैमध्ये ओढवणाऱ्या भीषण पाणीसंकटाची चाहूल सदस्यांना लागली. १४ मार्च २०१६ पूर्वी गंगापूर धरणात १८१० दलघफू म्हणजे ३२.१४ टक्के पाणीसाठा असून धरणसमूहात २४०३ दलघफू म्हणजे २५.६६ टक्के साठा आहे. महापालिकेने ३३०० दलघफू आरक्षणापैकी आतापर्यंत १८४२ दलघफू पाण्याचा वापर केला आहे, तर गंगापूर आणि दारणामिळून १४५७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. ३१ जुलैपर्यंत १३८ दिवसांसाठी मनपाला प्रतिदिन २९९ दशलक्ष लिटर्स (१०.५६ दलघफू) पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
शहरात आणखी पाणीकपात अटळ
By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST