नाशिक : डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल शंभरहून अधिक म्हणजेच ११० संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ११ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेने प्रतिबंधक कारवाई अधिक वेगाने सुरू केली आहे. त्याच प्रकारे जे खासगी वैद्यकीय व्यावसायिक डेंग्यू रुग्ण आढळल्याचे पालिकेला कळविणार नाहीत ते कारवाईस पात्र ठरू शकतात, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे म्हणणे असून, तसे आदेश काढून संबंधितांना कळविण्यात येणार आहे.नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे अधिकृत रुग्ण शंभर होते. आता नोव्हेंबर महिन्यातच संशयित रुग्णांची संख्या ११० वर गेली आहे. म्हणजेच इतक्या रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २७ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ११ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एक रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहे. त्यामुळे डेंग्यू आणखी किती दिवस त्रस्त करणार, असा प्रश्न आहे. पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी मात्र संशयित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र कमी होत आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रभाव ओसरेल, असा दावाही त्यांनी केला आहे.खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण आढळत आहेत; परंतु त्याबाबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून पालिकेला कळविले जात नाही. नागरिकांची ओरड झाल्यानंतर पालिकेला ही माहिती माध्यमांमधून मिळते. त्यामुळे त्यावर संशयित डेंग्यू रुग्ण सापडल्यानंतर पालिकेला त्वरित माहिती न कळविल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे असून, तसे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिमेकडे लक्ष पुरविले जात असून, ज्या भागात संशयित रुग्ण आढळेल अशा ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दहा दिवसांत तब्बल शंभरहून अधिक संशयित रुग्ण
By admin | Updated: November 11, 2014 00:51 IST