नाशिक : दरवर्षीच्या तुलनेत नैऋत्य मान्सूनचे केरळमधील आगमन चार दिवसांनी लांबल्याने नाशिकमध्ये पावसाळा सुरू होण्यास १४ जून उजाडू शकतो, असा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, शहराच्या कमाल तपमानात वाढ होत असून, येत्या दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतात. दरवर्षी साधारणत: १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होते. त्यानंतर आठवडाभराने म्हणजे ७ जून रोजी तो महाराष्टÑात (मुंबईत) दाखल होतो. त्यापुढील दोन-तीन दिवसांत मान्सून नाशिक जिल्ह्यात पोहोचतो आणि पावसाळ्याला प्रारंभ होतो. गेल्या वर्षी मात्र या वेळापत्रकात बदल होऊन मेच्या अखेरच्या आठवड्यातच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही तो २ जून रोजीच धडकला होता. यंदा मात्र मान्सूनला चार दिवस उशीर होत आहे. त्यानुसार तो यंदा ७ ऐवजी ११ जून रोजी मुंबईत दाखल होऊन १४ जूनपर्यंत नाशिक जिल्ह्यात पोहोचेल, असा अंदाज आहे. सध्या मान्सूनने अंदमान काबीज केले असून, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, नैऋत्य अणि मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. त्याची उत्तरेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे तो १४ जूनच्या आधीही नाशकात पोहोचू शकेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, हवामान खात्याने मात्र मान्सून केरळमध्ये चार दिवस उशिरा येत असल्याने तो महाराष्टÑातही विलंबाने दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यास नकार दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडता येणार नसल्याचे खात्याच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मान्सून १४ जूनपर्यंत नाशकात होणार दाखल
By admin | Updated: May 21, 2014 00:50 IST