अझहर शेख,नाशिककुंभमेळ्यानिमित्त शहरातील साधुग्राम, त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने साधू-महंत, भाविक दाखल झाले आहेत. त्यांच्यामध्ये मौखिक कर्करोगाविषयीची जनजागृती व्हावी, तसेच मौखिक आरोग्य जोपासले जावे, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या जन स्वास्थ्य अभियानामध्ये इंडियन डेन्टल असोसिएशनने (आयडीए) सहभाग घेतला आहे. आज बुधवारी (दि.२) पासून साधुग्रामच्या आखाड्यांमध्ये मोबाइल डेन्टल व्हॅन दंत वैद्यकांच्या चमूसोबत धावणार आहे. पहिल्या पर्वणीपासून साधुग्राम व कुशावर्ताच्या परिसरात आयडीए आणि केबीएच दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत मौखिक आरोग्य तपासणीला प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या साधुग्राममध्ये तीन व त्र्यंबके श्वर येथे एक असे चार शिबिर सुरू असून, आखाड्यांमध्ये मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून पोहचून साधू-महंतांच्या मौखिक आरोग्याची तपासणी करण्यास प्राधान्य देणार असल्याचे उपक्रमाचे प्रमुख डॉ. रिकिन मर्चंट यांनी सांगितले. भारतामध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीयांकडून अतिप्रमाणात केले जाणारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे आहे. यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
दर दिवसाला १५0 जणांची तपासणी४साधुग्राममधील मोफत शिबिराच्या तपासणी केंद्रावर दर दिवसाला किमान १५0 भाविक, साधूंच्या मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात येत असल्याचे र्मचंट यांनी सांगितले. भारतीयांमध्ये व्यसनाधिनता मोठय़ा प्रमाणात असून, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व्यापक असल्याचे तपासणीदरम्यान प्रत्यक्षरीत्या आढळून येत असल्याचे ते म्हणाले.
इच्छित मौखिक आरोग्य प्राप्तीचे ध्येय
भारतामध्ये इंडियन डेन्टल असोसिएशनच्या ३६0 शाखांच्या माध्यमातून देशभरात मौखिक आरोग्याची इच्छित काळजीबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. जागतिक स्तरावरील दंत वैद्यकीय संघटनांशी संलग्न असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून भारतीयांमध्ये मौखिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असून, २0२0 पर्यंत प्रत्येक भारतीयाला इच्छित मौखिक आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी संघटना सातत्यपूर्ण पद्धतीने कार्यरत आहे.
कुंभपर्वणीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण देशभरातून भाविक, तसेच साधू-महंत दाखल होत आहेत. मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती करण्याची संधी असल्याने उपक्रम हाती घेतला आहे.- डॉ. अशोक ढोबळे, महासचिव, आयडीए