सुयोग जोशी
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ करून प्रदुषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी (दि.९) सकाळी रामकुंडात उतरून आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी तसेच संपूर्ण विश्वभर महाराष्ट्राचे लौकिक वाढवणारी पवित्र गंगा गोदावरी माता दूषित होत चालली आहे. गंगा गोदावरीच्या पवित्र पाणी हे दूषित दुर्गंधीत झाले असून त्यामुळे जर भविष्यात कोणाला कुठल्याही प्रकारचा काही एक त्रास झाल्यास त्याला प्रशासन व व्यवस्थापन जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. गंगेची स्वच्छता चांगल्या प्रमाणात झाली पाहिजे, दूषित पाणी गंगा गोदावरीमध्ये सोडण्यात सक्त मनाई करण्यात यावी, पाणी पवित्र निर्मळ ठेवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून कारवाई करण्यात यावी, कंपन्यातील दूषित पाणी, गटारीचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात सक्त मनाई करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.नदीची अवस्था बिकटगोदावरी नदी आपल्या नाशिकला मोठे प्रसिद्धीचे स्थान देते. जगभरात आपले नाव उंचवणारी ही पवित्र गोदावरी माता असून प्रामुख्याने याच तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरतो. सध्या हिच नदी प्रचंड प्रमाणात दूषित होत आहे. तिच्यावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण होत असून उद्योग व्यवसायिकांनी आपल्या स्वतःच्या उपजीविके करता आपल्या कंपनीचे दूषित पाणी गंगामैयात सोडले आहे, सध्या नदीची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार तक्रार करून आंदोलन करून सुद्धा यावर कुठलाही प्रकारचा ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, रतनकुमार इचम, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, मनोज घोडके, खंडेराव मेढे, नितीन काळे, सचिन सिन्हा, सत्यम खंडाळे, नितीन माळी, धीरज भोसले, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, ज्ञानेश्वर बगडे, विजय अहिरे, विशाल भावले, मिलिंद कांबळे, अर्जुन वेताळ, गोकुळ नागरे, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, संदीप दोंदे, अतुल पाटील, विश्वास तांबे, किरण क्षीरसागर, राकेश परदेशी, नितीन दानापुणे, महिला सेना शहराध्यक्ष आरती खिराडकर, अक्षरा घोडके उपस्थित होते.