पेठ : तालुक्यात सोमवार (दि.६) रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना घडली. मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार नाशिक मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ननाशी, करंजाळी, आसरबारी परिसरात रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी भूगर्भात मोठा आवाज होऊन जमीन थरथरल्यागत नागरिकांना जाणवले. यामध्ये साधारण ४ सेकंदांत २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवल्याची नोंद झाली असून, सदरचा धक्का सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पेठ तालुक्यात गोंदे हे भूकंपाचे केंद्र असून, वर्षभरात वारंवार अशा प्रकारचे धक्के जाणवत असल्याने रात्री-अपरात्री नागरिक भयभीत होऊन जात असल्याचे दिसून येते. रात्री आवाज आल्यावर अनेकांनी समाजमाध्यमातून व भ्रमनध्वनीवरून गावागावात विचारणा करून एकमेकांना धीर दिला. यासंदर्भात गोंदे, भायगाव परिसरात भूकंपमापन यंत्र बसविण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे.
पेठ तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:42 IST