मालेगाव : येथील नवीन बसस्थानकात प्रवाशांना खासगी वाहनांचे धक्के लागत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. यातून वाद निर्माण होतोे त्यामुळे अनेक प्रवाशांनी बसस्थानकाकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. यात काहीवेळा प्रवाशांवर दादागिरी केली जाते, प्रसंगी मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. यातील काही वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालविल्याने झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नियमानुसार बसस्थानकातून खासगी वाहनांना जा-ये करण्यास बंदी आहे; मात्र या नियमाकडे लक्ष देण्यास येथील अधिकाऱ्यांना सवड नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जुन्या महामार्गावरून कुसुंबा रस्त्यावर जा-ये करण्यासाठी बसस्थानकाबाहेरून रस्ता आहे; मात्र कोणतीही आडकाठी नसल्याने वाहनधारक बसस्थानकाचा उपयोग करतात. गर्दीच्या वेळी चालकांना बस लावताना प्रवाशांपेक्षा या वाहनधारकांवर जास्त लक्ष ठेवावे लागते, कारण चुकून बसचा धक्का लागला तर चालकाला मारहाण झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. या वाहनधारकांना ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)धक्का लागल्यामुळे वादबसस्थानकाला दोन बाजूने प्रवेशद्वार असून, त्यात एक पश्चिमेकडे कुसंबा रस्त्यावर व दुसरे जुन्या महामार्गाकडे आहे. या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात खासगी वाहने स्थानकात जा-ये करतात. त्यात दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. दिवसभरात जुन्या महामार्गावरून कुसुंबा रस्त्यावर ये-जा करण्यासाठी वाहने स्थानकाच्या एका प्रवेशद्वारातून प्रवेश करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात. यात अनेक वाहनांचा प्रवाशांना धक्का लागून वाद होतात.
जीव मुठीत धरून वावरतात प्रवासी
By admin | Updated: September 2, 2015 23:14 IST