नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भटक्या विमुक्त जाती संघाचे संस्थापक सरचिटणीस जी. जी. चव्हाण, कल्पना पांडे, संजय धुर्वे यांच्यासह अतिक्रमणधारकांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणचे अतिक्रमण महानगरपालिकेने जमीनदोस्त केले आहे.मनपा विभागीय अधिकारी अशोक पांडुरंग वाघ यांना १४ नोव्हेंबर रोजी नगरसेवक रंजना भानसी व अरुण पवार यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील सर्व्हे नंबर २५७, २५९ या मनपाच्या मोकळ्या भूखंडावर १५० ते २०० लोक झोपड्या टाकून अतिक्र मण करीत असल्याची माहिती दिली होती़ यानुसार विभागीय अधिकारी वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे चव्हाण, पांडे, धुर्वे यांच्यासह इतर कार्यकर्ते या मोकळ्या भूखंडावर फलक लावून पूजा करीत होते. त्यामुळे वाघ यांनी त्यांना, तुम्ही जागेचे बेकायदेशीरपणे वाटप करून देत आहात, तुमच्याकडे मनपा प्रशासनाची परवानगी आहे का? अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे; परंतु जागेबाबत इतर कोणतीही परवानगी नाही. विभागीय अधिकारी वाघ यांनी संबंधितांना या जागेवर अतिक्र मण न करण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी गोंधळ घालून अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त आऱ एम़ बहिरम यांच्या आदेशानुसार वाघ यांनी रविवारी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात अतिक्र मण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नाशिक महानगरपालिकेने हे अतिक्र मण गुरुवारी (दि. २०) हटवले. त्यावेळी संतप्त झोपडपट्टीवासीयांनी महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता़ (प्रतिनिधी)
म्हसरूळ अतिक्र मण प्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: November 24, 2014 00:02 IST