त्र्यंबकेश्वर : भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. आपला निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात येईल असे, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, कोअर समितीचे सदस्य अपूर्व हिरे आदि नेत्यांनी सांगितले.जिल्हाभरातील बहुतेक दोन-तीन तालुके वगळता सर्व तालुका कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत. प्रशांत गायधनी यांच्या निवासस्थानी जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्या बैठकीत दादाजी जाधव, डॉ.अपूर्व हिरे आदि मान्यवरांसह अॅड. श्रीकांत गायधनी, प्रशांत गायधनी, लक्ष्मीकांत थेटे, गिरीश जोशी, श्यामराव गंगापुत्र, मोहन झोले आदि उपस्थित होते, तर तालुक्यातील कधी नव्हे ते पाचशेच्या वर भाजपा कार्यकर्ते जणू शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आले होते. हॉल पूर्ण भरून बाहेरदेखील कार्यकर्ते उभे होते. असा प्रतिसाद यापूर्वी कधीही पाहावयास मिळाला नव्हता. या सर्वांना प्रतीक्षा होती ती भाजपा तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, तर शहरातील कार्यकर्त्यांना उत्कंठा होती, शहराध्यक्षपदाची! तथापि सर्वांची निराशा झाली. सर्व इच्छुकांच्या मुलाखती पार पडून या सर्वांचे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपापसात एकमत करण्यासाठी पक्षश्रेष्ठांनी संधी दिली होती. शेवटी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीचे अधिकार वरील दोन्ही नेत्यांना दिले; मात्र पक्षश्रेष्ठींनी अद्याप निर्णय दिला नाही. (वार्ताहर)
निवड न होताच आटोपली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 23:14 IST