नाशिक : जर्मन सरकारच्या पैशांवर दक्षिण-पूर्व आशियातील फिलिपीन्स या शहराची वारी करण्याची चालून आलेली संधी आयुक्तांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे गमावण्याची वेळ महापौरांवर आली. ‘वातावरणातील बदल’ या विषयावर तीन दिवसांच्या कार्यशाळेसाठी महापौरांसह आयुक्त आणि एक कार्यकारी अभियंता फिलिपीन्स दौऱ्यावर पुढील आठवड्यात रवाना होणार होते. परंतु, आयुक्तांच्या बदलीमुळे दौराही लटकला आणि महापौरांवर नाशकातच बदलीमुळे बदललेल्या वातावरणाला सामोरे जाण्याची वेळ आली.जर्मन सरकारची अंगीकृत असलेली एंगेजमेंट ग्लोबल आणि इकली या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने फिलिपीन्स या देशातील म्युनॉझ या शहरात दि. १२ ते १५ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत ‘वातावरणातील बदल’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर संस्थेच्या वतीने दक्षिण आशिया, आशिया आणि जर्मनी या देशांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कार्यकारी अभियंता एस. आर. वंजारी हे तिघे सदर कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी फिलिपीन्सला रवाना होणार होते. सदर परदेश दौऱ्याचा संपूर्ण खर्च जर्मनीतील संबंधित संस्था करणार होती. त्यानुसार महापौरांसह आयुक्त व कार्यकारी अभियंता यांची व्हिसाची तयारी सुरू होती शिवाय शासनाकडेही परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा सुरू असतानाच गुरुवारी अचानक शासनाकडून आयुक्त डॉ. गेडाम यांच्या बदलीचे आदेश आले आणि सारे वातावरणच बदलले. आयुक्तांची बदली झाल्याने शासनाकडे पाठविलेला प्रस्तावही बारगळला आणि ऐन हातातोंडाशी आलेली परदेशवारीची संधी गमावण्याची वेळ महापौरांसकट कार्यकारी अभियंत्यावर आली. महापौरांच्या हुकलेल्या या परदेशवारीची महापालिका वर्तुळात खमंगपणे चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)
महापौरांची हुकली फिलिपीन्सची वारी
By admin | Updated: July 9, 2016 00:49 IST