नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत कर्मचारी आंदोलनाविषयी व नीलेश दिंडे यांच्या कार्यालयीन कामकाजाविषयी चर्चा झाली. सन २०१९ ते २०२० या कार्यकाळात त्र्यंबकेश्वर येथील नाक्यावर नियुक्ती असताना दिंडे यांनी नेहमीपेक्षा कमी वसुली केली. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न कमी झाले. यापूर्वी त्याच नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिंडे यांच्या तुलनेत अधिक वसुली केली होती. तसेच मुंबई नाका, औरंगाबाद नाका येथे कार्यरत असतानादेखील त्यांच्या कामात पारदर्शकता नव्हती व वसुलीदेखील कमी होती. त्यांच्या जागेवर नियुक्त कर्मचारी हे दिंडे यांच्यापेक्षा अधिक वसुली करत आहेत. त्यामुळे दिंडे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे निष्पन्न होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वसुलीचा आकडा आणि बाजार समितीचा पगारापोटी झालेला खर्च बघता कामाच्या ठिकाणी दिंडे नक्की उपस्थित राहात नव्हते. त्यावर संचालक मंडळाने दिंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आरोपपत्र दाखल करत खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. गैरकृत्य व खातेनिहाय चौकशीवर पांघरूण घालण्यासाठी दिंडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे दिंडे यांना बाजार समितीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती उपसभापती प्रभाकर मुळाणे यांनी दिली.
बाजार समिती सेवेतून कर्मचारी बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST