नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच ६ जुलैला घोषित केलेली सुटी मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्याने ऐनवेळी बदलून ती ७ जुलैला जाहीर केली आणि या सुटीचा संदेश शाळां-शाळांमधून पोहोचविण्यात तारांबळ उडाल्याने अखेर महापालिकेच्या शाळांसह शहरातील अनेक खासगी इंग्रजी शाळांचा गोंधळ उडाला. ज्यांच्यापर्यंत संदेश वेळेत जाऊन पोहोचला त्यांनी बुधवारी शाळा भरविल्या, तर ज्यांना मिळाला नाही त्यांनी सुटी देऊन टाकली. चंद्रदर्शनाच्या या घोळामुळे विद्यार्थ्यांना मात्र ईदच्या सुट्यांचा डबल धमाका अनुभवता येणार आहे.शासनाच्या वतीने रमजान ईदची सुटी बुधवार, दि. ६ जुलै रोजी नमूद करण्यात आलेली आहे. दिनदर्शिका - पंचांगांमध्येही ईदची सुटी ६ जुलैच निश्चित करण्यात आली. मुस्लीम धर्मियांच्या परंपरांनुसार रमजान ईदच्या आदल्या दिवशी चंद्रदर्शन न झाल्याने ईद दि. ६ ऐवजी ७ जुलै रोजी साजरी करण्याचे ऐलान झाले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शासनाकडून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना बुधवार ऐवजी गुरुवारी शाळांना सुटी देण्याचे निर्देशित करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना मनपा शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि लगोलग सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व्हॉट्स अॅप, एसएमएसच्या माध्यमातून शासननिर्णयाची माहिती कळविली गेली. शाळा सुटण्यापूर्वी ज्या मुख्याध्यापकांच्या हाती संदेश लागला त्यांनी बुधवारी सुटी न देता गुरुवारी सुटी जाहीर केली, तर ज्यांना उशिराने संदेश मिळाला त्यांना बुधवारीच सुटीचा दिवस अंमलात आणणे भाग पडले. त्यामुळे, बुधवारी मनपाच्या अनेक शाळा बंद राहिल्या तर मोजक्याच शाळा भरल्या. त्या शाळांमध्येसुद्धा विद्यार्थ्यांची मोजकीच उपस्थिती लागली. आता गुरुवारीही सुटी जाहीर केली असल्याने आणि किती विद्यार्थी शाळेत येतील याबाबत शंका असल्याने मनपा शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. मनपा शाळांप्रमाणेच शहरातील अनेक इंग्रजी शाळाही बंद राहिल्या तर काही सुरू होत्या. (प्रतिनिधी)
चंद्रदर्शनाचा घोळ, सुट्यांचा झोल
By admin | Updated: July 7, 2016 00:35 IST