नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने मराठी वाचन सप्ताह पाळला जाणार आहे. त्याचा शुभारंभ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्यावर करण्यात आला. मराठी वाचन सप्ताहांतर्गत नवीन मध्यवर्ती बसस्थानकामध्ये पुस्तक विक्रेत्यांसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने पुस्तक विक्रीसाठी जागा उपलब्ध क रून देण्यात आली आहे. सप्ताहच्या शुभारंभाप्रसंगी बसस्थानकात यावेळी रेखा भंडारे, यंत्र अभियंता श्रावण सोनवणे या मान्यवरांसह सांख्यिकी अधिकारी राकेश पवार आदी उपस्थित होते. या सप्ताहमध्ये पुस्तक विक्रेत्यांना बसस्थानकाच्या आवारात पुस्तके विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.परिवहन महामंडळाच्या पुढाकारातून गेल्या तीन वर्षांपासून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला मराठी भाषेतील अभिजात संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने एसटी मराठी वाचन सप्ताह पाळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांना बसस्थानकावर विविध पुस्तके या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
‘एस.टी.’चा मराठी वाचन सप्ताह शुभारंभ : मराठी जागरसाठी पुस्तकविक्रेत्यांना मोफत जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:25 IST