नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या दोन रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये तीनशे वॉर्डबॉय मानधनावर भरती करण्यात येणार असून, त्यासाठी बुधवारी (दि.५) वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत. एका अधिकाऱ्याने आउटसोर्सिंगव्दारे भरती करण्याचा प्रयत्न यामुळे फसला असून, आता थेट भरती होणार आहे.
महापालिकेने सध्या दोन रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवले आहेत. त्यातच अनेक ठिकाणी महापालिकेने कोविड केअर सेंटर्स उभारले आहेत. त्याठिकाणी वॉर्डबॉय अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने मध्यंतरी वॉर्डबॉय भरती करण्याचे ठरवले, मात्र तीनशे वॉर्डबॉय आउटसोर्सिंगच्या जुन्या ठेकेदाराकडून निविदा न मागवता भरण्याचा घाट एका अधिकाऱ्याने घातला होता. आयुक्त कैलास जाधव यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर आता त्यांच्या सूचनेप्रमाणे थेट मानधनावर भरती करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.५) वॉक इन इंटरव्ह्यूव्दारे भरती होणार आहे.
उमेदवारांसाठी नववी पास पात्रता असून, त्यांना रुग्णालयातील साफसफाईबरोबरच कोराेना रुग्णांचे मृतदेह वेष्टणात बांधून ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे करण्याची अट आहे. तसेच राजकीय वशिला लावल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना बारा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.