सातपूर प्रभाग समितीची बैठक सभापती रवींद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी घंटागाडी, अतिक्रमण, बांधकाम, उद्यान, आरोग्य अशा विविध विषयांवर चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. प्रभाग ११ मध्ये किरकोळ कामासाठी नवीन ड्रेनेजलाईन का टाकली? असा प्रश्न नगरसेवक सलीम शेख यांनी उपस्थित करून भुयारी गटार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. विशेष म्हणजे, तीन दिवस चेंबरच सापडला नसल्याने नवीन लाईन टाकण्यात आल्याचे केविलवाणे उत्तर देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापती धिवरे यांनी दिले. दुर्गंधी येत असल्याचे कारण सांगून सातपूर विभागातील घंटागाड्या थेट द्वारका येथे उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे सातपूर विभागातील घंटागाड्या पुन्हा सातपूर विभागातच उभ्या करण्याची मागणी सदस्यांनी केली. नगरसेवक भागवत आरोटे यांनी जेसीबीचा मुद्दा उपस्थित करून मोकळ्या प्लॉटवरील कामकाजाचे तास कसे मोजले जातात? उघड्यावर मांस विक्री का बंद केली जात नाही? अतिक्रमण विभागाचे काही लागेबांधे आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करून संबंधितांना जाब विचारला. नगरसेविका सीमा निगळ यांनी मटन मार्केटच्या नूतनीकरणासह कामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेविका माधुरी बोलकर यांनीही कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक मधुकर जाधव यांनी बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न उपस्थित करताना नवीन वसाहतीतील कामांसाठी महापालिकेला पैसे अदा केले जातात. मात्र, अशा वसाहतींना दोन-दोन वर्षे सुविधा का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. फांद्यांच्या छाटणीवरून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर देण्याचा इशारा नगरसेविका इंदुबाई नागरे व अलका अहिरे यांनी दिला.
चौकट==
आरोग्य विभागातील सातशे कर्मचाऱ्यांच्या भरतीत सातपूरला दुय्यम स्थान, घंटागाडी, वाहनतळ हलविणे, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे. या ना त्या कारणाने सातपूर विभागाला दुय्यम स्थान मिळत आहे. त्यामुळे पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी सातपूरकर म्हणून आंदोलन पुकारण्याचे आवाहन सलीम शेख यांनी करताच सर्वांनी एकमुखाने होकार दर्शविला.