वकीलवाडीमध्ये असलेल्या सारडा संकुल या व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी संकुलाच्या वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकी झाडांच्या फांद्यांखाली दाबल्या गेल्या. झाडाच्या काही फांद्या वर्दळीच्या रस्त्यावरही येऊन पडल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्यांचा अडथळा पेट्रोलकटरच्या सहाय्याने जवानांनी कापून दूर केला. या दुर्घटनेत ॲक्सेस, ॲक्टिवा, अव्हेंजर यांसारख्या दुचाकींचे नुकसान झाले. दरम्यान, हिरवागार असलेला डेरेदार आम्रवृक्ष वादळवारा नसताना अचानकपणे कसा कोसळला? याविषयी परिसरात चर्चा रंगली होती. झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पद्धतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या उद्यान विभागाने याबाबत पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
-----