मालेगाव : येथील सटाणा नाका चौक सुशोभीकरणासाठी परिसरात दुपारी मनपातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. त्यात वीसहून अधिक छोट्या-मोठ्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या सटाणा नाका चौकात अनधिकृतरीत्या काही व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असे. मात्र मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. येथील मालेगाव विकास आघाडीतर्फे सदर चौक सुशोभीकरण कामास सुरुवात करण्याचा निर्णय झाल्यानंतर हे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मनपा सहाय्यक आयुक्त अशोक म्हसदे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हातगे, मनपा प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी सटाणा नाका चौकात दाखल झाले. या ठिकाणी सोयगाव बाजारपेठेकडे जाणार्या रस्त्यावरील व मुख्य चौकात या रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी असलेली वीसहून अधिक विविध प्रकारची अतिक्रमणे बुलडोझर यंत्राने काढण्यात आली. सदर अतिक्रमण काढताना प्रारंभी काही व्यावसायिकांनी किरकोळ विरोध केला. नंतर मात्र सर्वांनी सहकार्य करत आपापल्या वस्तू, दुकानांतील साहित्य, टपर्या आदि हलविले. यावेळी मालेगाव विकास आघाडीचे गटनेते सुनील गायकवाड, मदन गायकवाड, सुधीर जाधव, नरेश चांडक आदिंसह आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. खबरदारी म्हणून यावेळी पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मालेगावी अतिक्रमणे हटविली
By admin | Updated: May 20, 2014 23:48 IST