मालेगाव : येथील मोसम नदीची ओळख आता केवळ शहरातून वाहणारी गटारगंगा अशी राहिली नसून ती काटेरी झाडझुडपांआडील जुगाऱ्यांचा खुलेआम अड्डा झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ शहर- तालुक्यातील ग्रामीण भागातीलच नव्हे तर धुळे, चाळीसगाव या भागातीलही काही जुगारी आढळून येतात. मनपा प्रशासनाने नदीपात्रातील काटेरी झुडपांची साफसफाई करावी व पोलीस प्रशासनाने या जुगाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नदीकाठावरील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मोसम नदी कॅम्प बंधारा ते झांजेश्वर अशी जवळपास किमान सहा किलोमीटर अंतर कापत शहरातून वाहत जाते. गेल्या २०-२५ वर्षांत ही नदी पावसाळा वगळता कधीही दुथडी भरून वाहिलेली नाही. या कालावधीत शहरातील केरकचरा व मलमूत्र वाहून नेणे असे गटारनाल्याचे स्वरूप या नदीस प्राप्त झाले आहे. नदीत गेल्या काही वर्षांत जागोजागी काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या काटेरी झाडेझुडपांच्या आधारे आणि नदीकाठालगत अतिक्रमित घरांच्या साहाय्याने अलीकडच्या काळात नदीपात्रात जुगार खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवस उगवल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी अनेक जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे दिसून येते. त्यात पत्ते व सारीपाटफेम चल्लसच्या आधारे जुगार खेळला जातो. अगदी चिल्लर रकमेपासून शेकडो रुपयांपर्यंत जुगार खेळला जातो. काही शालेय विद्यार्थ्यांनाही जुगाराचे व्यसन लागले आहे. खाऊसाठी अथवा शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी दिलेले पैशांची अल्पवयीन विद्यार्थी जुगारात नासाडी करत असल्यामुळे चिंतेचा विषय झाला आहे. काही बेकार तरुण नोकरी-धंदा करून अर्थाजन करण्यापेक्षा जुगारातून पैसे कमावण्याच्या नादात असतात. काही खासगी नोकरदार-किरकोळ व्यावसायिकही या ठिकाणी जुगाराच्या माध्यमातून अधिक पैसे कमावण्याच्या नादात हजेरी लावतात. जुगार खेळताना अल्पवयीन विद्यार्थी व तरुणांना गुटखा, तंबाखू, सिगारेट व दारूचे व्यसन लागते. या अड्ड्यातून जुगार खेळणारेच पुढे शहरातील विविध प्रकारच्या गुन्हेगारीत सामील असतात किंवा त्यास खतपाणी घालत जेणेकरून पुन्हा जुगाराचे अड्डे सुरू होणार नाहीत, अशी मागणी शहरातील व नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.