मनमाड : भारताने पाकसीमेवरील अतिरेकाच्या सर्जिकल आॅपरेशन मोहिमेद्वारे ज्या पद्धतीने खात्मा केला त्याच पद्धतीने देशातील जातीयवाद करणाऱ्या संशयीताचा बंदोबस्त अशा पद्धतीच्या मोहिमेद्वारे करण्यात यावा, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गुरूवारी मनमाड येथे भेट दिली़ यावेळी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरक्षणाबद्दल एक शब्द न बोलणाऱ्यांनी आता हा मुद्दा उपस्थित करून राजकारण चालवले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़ सीमेवर जवानांनी दहशतवाद्यांविरोधात केलेले सर्जिकल स्ट्राइक आता जातीयवाद्यांविरोधात करण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केली़जे समाजकंटक अशा प्रकारे सामाजिक तेढ निर्माण करत आहेत त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती-जमातीच्या जनतेसाठी अॅट्रॉसिटी कायदा हे एक संरक्षण आहे. अनेक कायद्यांचा दुरूपयोग होत असताना ते कायदे रद्द करण्याची मागणी होत नाही. मात्र अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मत कवाडे यांनी व्यक्त केले. सर्व समाजसमूहांनी एकमेकांच्या जिवावर न उठता एकमेकांच्या सुख-दु:खाचे साथीदार व्हा, असे आवाहन मुक्ती घोषणा दिनानिमित्त कवाडे यांनी केले. यावेळी पक्षाचे राज्य सरचिटणीस गणेश उन्हवणे, चरणदास इंगोेले, देवेंद्र आडसुळे, अशोक जगताप, सुनील साळवे, रवींद्र दाभाडे, रिजवान खान, अनिल संसारे, रवींद्र अहिरे, प्रदीप अहिरे, राज पवार उपस्थित होते. (वार्ताहर)
जातीयवाद्यांचे ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा
By admin | Updated: October 13, 2016 23:47 IST