राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा होणे ही एक उत्साहवर्धक बाब आहे. यापूर्वी जाहिरात क्षेत्राने अशाप्रकारे एक ठरावीक दिवस निश्चित करून तो साजरा केला नव्हता.१४ आॅक्टोबर हाच राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे या दिवशी १९०५ साली देशातील पहिली अॅड एजन्सी बी. दत्ता ऊर्फ दत्तात्रय बावडेकर यांनी मुंबई येथे सुरु केली.आजच्या काळात प्रत्येकजण जाहिरात संस्थांच्या द्वारे विविध माध्यमांच्या संपर्कात येत असतो. दुकानदार, कारखानदार, व्यावसायिक त्याचबरोबर वाढदिवसासाठी शुभेच्छा किंवा श्रद्धांजली इ.साठी वैयक्तिक जाहिराती देणारे तसेच जाहीर नोटीस देणारे अशा असंख्य प्रकारच्या ग्राहकांचा समावेश दिसून येतो. या जाहिरात दिनाच्या कार्यक्रमात अॅड एजन्सीज् रेडिओ, टीव्ही चॅनल त्याचप्रमाणे आऊट डोअर (होर्डिंग्ज्, वॉल पेंटिंग इ.) या सर्व माध्यमांत काम करणाऱ्यांचा सहभाग आहे. हे युग जाहिरातीेंचे युग आहे असे म्हटले जाते. स्पर्धात्मक जगात जाहिरातीला पर्याय नाही. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत जाहिरात क्षेत्राची घोडदौड खूप वेगाने झालेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे उत्पादनाची जाहिरात केली जाते; पण आजही या सर्वांमध्ये वृत्तपत्रीय जाहिरातींना ग्राहकाची प्रथम पसंती आहे. कमी खर्चिक, प्रभावी व अधिक काळ परिणाम करणारी असल्यामुळे वृत्तपत्र जाहिरात सर्वप्रथम केली जाते. नाशिकच्या दृष्टीने बघितले तर जाहिरात एजन्सीज् मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये छोट्या जाहिराती, जाहीर नोटीस यापासून ते मोठ्या क्रिएटिव्ह डिझाईन तयार करून त्या प्रसिद्ध करणाऱ्या अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् कार्यरत आहेत. या जाहिरातदारांची संघटना नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) गत बारा वर्षांपासून कार्यरत आहे. ‘नावा’तर्फे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ‘नावा करंडक’ क्रिकेट स्पर्धा, सभासदांसाठी जाहिरात क्षेत्राशी संबंधित उद्बोधक व माहितीपर व्याख्याने, चर्चासत्रे, जाहिरात एजन्सीज्च्या कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन इ. कार्यक्रम नियमित घेण्यात येतात. त्यामुळेच नाशिकमधील बहुतेक एजन्सीज्मध्ये सौहार्दाचे व खेळीमेळीचे वातावरण आहे. या कार्यांमध्ये वर्तमानपत्रांचे व संस्थेच्या हितचिंतकांचे, प्रायोजकांचे सहकार्य अनमोल आहे. आज राष्ट्रीय जाहिरात दिनाच्या निमित्ताने सर्व वृत्तपत्रे, हितचिंतक, जाहिरात एजन्सीज् ह्यांचे अभिनंदन आणि ज्यांच्यामुळे हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे त्या जाहिरातदार संस्था, व्यक्ती यांना शतश: धन्यवाद...- विठ्ठल देशपांडे