नाशिक : कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या तेथील लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकात पोहोचलेल्या राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बसेसवर ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसेसवर सध्या महाराष्ट्राच्या नकाशासह जय महाराष्ट्र ब्रीद आकारास येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्र्यांनी विविध योजना जाहीर करतानाच एसटी बसेसवर जय महाराष्ट्र असे बोधचिन्ह असेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार एसटीच्या पारंपरिक बोधचिन्हात थोडासा बदल करून त्यामध्ये ‘जय महाराष्ट्र’ या महाराष्ट्राची अस्मिता जागविणाऱ्या घोषणेचा व महाराष्ट्राच्या नकाशाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई आगार येथून मुंबई-बेळगाव ही पहिली बस ‘जय महाराष्ट्र’ या नवीन बोधचिन्हासह पोहोचली. सध्या नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण बसेसवर येथील कार्यशाळा आणि डेपोंमध्ये जय महराष्ट्र लिहिण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लोगोच्या खालीच जय महाराष्ट्र आणि या दोन्ही अक्षराच्या मध्ये महाराष्ट्राचा नकाशा असे ब्रीद मिरविले जात आहे. परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य सांगितले जात असले तरी त्यामागे कर्नाटकात जय महाराष्ट्रला विरोध करण्यात आल्याने महाराष्ट्राची अस्मिता म्हणून बसेसवर आता कायमस्वरूपी जय महाराष्ट्र असणार आहे.
महाराष्ट्राची अस्मिता जपणार एसटी बस
By admin | Updated: June 9, 2017 18:25 IST