पंचवटी : पेठ तालुक्यातील करंजाळी येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मुलांच्या गटात महंत जमनादास महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळी करून विजेतेपद पटकावले आहे. पेठ तालुक्यात प्रथमच करंजाळी महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन दिंडोरी तालुक्याचे आमदार नरहरी झिरवाळ, पद्माकर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांवर भर देऊन आपले नाव उज्ज्वल करावे, असे मनोगतातून व्यक्त केले. या स्पर्धेसाठी २७ महाविद्यालयांतील सुमारे १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दीपक जुंद्रे यांनी खेळाडूंना नवीन नियमावलीची माहिती दिली. या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात योगेश पवार, ६६ किलो वजनी गटात प्रशांत उगले, ८४ किलो गटात हर्षवर्धन सदगीर, तर १२० किलो गटात गौरव गणोरे या करंजाळी महाविद्यालयाच्या पहिलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडू ११ व १२ डिसेंबरला चांदवड येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) टीप- फोटो कॅप्शन- करंजाळी महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार नरहरी झिरवाळ. समवेत गोरखनाथ बलकवडे, दीपक जुंद्रे, एन. व्ही. पाटील, संतोष पवार आदि.
कुस्ती स्पर्धेत महंत जमनादास महाविद्यालयाला विजेतेपद
By admin | Updated: December 6, 2014 00:48 IST