हेमंत कुलकर्णी, नाशिकदूरस्थ पद्धतीने मुंबई वा अन्यत्र बसून येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार चालविणारे या संस्थेचे तूर्तासचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मते ‘प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त खाऊन पिऊन सुखी असल्यानेच गेल्या पंचवीस वर्षात संस्थेत एक पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही’! त्यांच्या या अजब शोधाचा हास्यास्पद श्लेष म्हणजे जे भुकेले असतात, तेच भ्रष्टाचारी असतात!सामान्यत: साहित्यिक हा एक अत्यंत संवेदनशील, सजग, डोळस आणि नीरक्षीरविवेकाचा धनी मानला जातो. कर्णिक यात मोडत असावेत अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे आणि ही शंका खरी असेल तर त्यांना समाजातील भुकेला आणि भरपेटला यातील नेमका कोणता वर्ग भ्रष्टाचाराने लिप्त असतो, हेही आकळायला काही हरकत नाही. पण खरा मुद्दा तो नाहीच. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेपासून तो पुरस्कार योजनेपर्यंतचा सारा तपशील वेळोवेळी दस्तुरखुद्द कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ताक्षरात तयार झालेला. त्यांनीच प्रतिष्ठानची जी घटना तयार केली त्या घटनेनुसार कोणताही विश्वस्त (खरे तर कार्यकारिणीचा सदस्य) कमाल दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या पदावर राहू शकत नाही, त्याला निवृत्त व्हावेच लागते. आजपर्यंत तसेच होतही आले आहे. जो निवृत्तला त्याच्या जागी अन्य विश्वस्तांनी प्रतिष्ठानच्या सामान्य सदस्यांमधून रिक्त जागी भरावी वा भराव्यात अशीही तरतूद तात्यांनीच करुन ठेवलेली. (खरे तर हे कार्य समस्त सभासदांच्या आम सभेकडे पोचते व्हावयास हवे होते) ज्याअर्थी त्यांनी अत्यंत नि:संदिग्ध शब्दात अशी तरतूद केली त्याअर्थी त्यांचा त्यामागे काही निश्चितच हेतू असणार. नवीन लोकाना संधी दिली तर नव्या कल्पना येतील व प्रतिष्ठानच्या कामाला नवी उभारी येत जाईल, असाच काहीसा हेतू त्यामागे असू शकतो. ‘जुन्यांनी मन:पूत भ्रष्टाचार केला आता नव्यांना संधी देऊ’ असा हेतू खचितच नसणार आणि भ्रष्टाचार करायला आहेच काय तिथे? (असं लोकाना वाटतं. कर्णिकांकडे याबाबत अधिक ज्ञान असू शकते)आजवर पाळली गेलेली प्रथा मोडीत काढून घटनेतील सक्तीच्या निवृत्तीचे कलम रद्द करण्याचा म्हणजेच घटना दुरुस्ती करण्याचा एक संकल्प मधु मंगेश यांच्या पौरोहित्याखाली अलीकडेच सोडण्यात आला असून तो साहजिकच वादग्रस्त ठरला आहे. त्या वादावर बोलतानाच कर्णिकांनी ‘वेळोवेळी घटनेत गरजेनुसार दुरुस्ती व्हावी अशी तात्यांची भूमिका होती (हे तात्यांनी त्यांना कधी सांगितले बरे?) प्रतिष्ठान ही काही सोसायटी नव्हे. त्यामुळे संचालक तीन वर्षांनी बदलावेतच असे नव्हे. कामात सातत्य राहावे म्हणून विश्वस्तांच्या बैठकीत दुरुस्तीचा ठराव मंजूर केला गेला आहे व त्यात बेकायदेशीर असे काही नाही’, असे प्रबोधन करुन ‘ते’ ऐतिहासिक उद्गार काढले आहेत.मुळात कोणत्या विश्वस्तांनी ठराव मंजूर केला? निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांनीच ना? म्हणजे एकूण प्रकार साटेलोट्याचा. या प्रतिष्ठानचे आजचे दुर्दैव म्हणजे तात्यासाहेब हयात असताना, त्यांचा सहवास लाभलेले आणि त्यांच्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणारे व एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही लोक तिथे नाहीत. नाशिककरांनी, नाशिककरांसाठी व नाशिककरिता स्थापन केलेल्या प्रतिष्ठानच्या डोक्यावर बाहेरचा अध्यक्ष बसविण्याचा जो पायंडा खुद्द तात्यांनी सुरु केला तो आजतागायत तसाच सुरु आहे आणि मधु मंगेश त्याच मालिकेतील एक आहेत. त्यांनी सुखेनैव अध्यक्षपद उबवीत रहावे पण ताजमहालला कोण्या गणपा मिस्तरीनी वीट लावण्याचा प्रकार केल्यागत कुसुमाग्रजांनी जे निर्माण करुन ठेवले त्यात उगा मोडतोड न करता आहे ते तसेच अबाधित ठेवावे इतकीच तात्यांवर आजही प्रेम करणाऱ्या तमाम नाशिककरांची आंतरिक इच्छा आहे.
मधु मंगेश कर्णिकांना लागलेला अफलातून शोध:
By admin | Updated: October 13, 2015 23:42 IST